सजीव कुंपण- असे करा शेतीमध्ये कमी खर्चात सजीव कुंपण……

आपल्या मालमत्तेचे संरक्षण व वेगळेपण जपण्याच्या दृष्टीने पूर्वापार सजीव अथवा निर्जीव घटकांचा वापर करून आपल्या हद्दीवर भिंतीसारखी रचना करीत आलो आहोत. शेतात लागवड केलेल्या मौल्यवान पिकांचे विविध कारणांनी नुकसान होते. या व्यतिरिक्त शेतात लागवड केलेल्या पिकांना जंगली तसेच मोकाट जनावरे इ. पासूनसुद्धा १८-२० टक्के नुकसान संभवते. आर्थिक क्षमतेनुसार व उद्देशानुसार विविध पर्यायांतून कुंपण उभारले जाऊ शकते. कुंपणाचे अनेक प्रकार आहेत. सजीव कुंपणामध्ये वेगवेगळ्या वनस्पतींचा वापर कुंपणासाठी केला जातो; तर निर्जीव कुंपणामध्ये दगडी भिंत, विटांची भिंत, चेनलिंकसारखे जाळीचे कुंपण, काटेरी तारेचे कुंपण व आधुनिक सौर कुंपण. एकदा उभारलेले कुंपण हलविणे, बदल करणे महागात पडत असल्याने कोणतेही कुंपण करण्याआधी आपल्या जागेचा सव्‍‌र्हे करून, आपली हद्द सुनिश्चित करूनच कुंपण बनवावे. कुंपण करताना प्रामुख्याने सभोवती जागा किती आहे, आसपास माणसांचा, लहान मुलांचा वावर किती आहे याचा विचार करूनच झाडे लावावीत. वनासारखी फार मोठी जागा असल्यास किंवा वनाजवळ जागा असल्यास तेथे मोठे खोल व रुंद चर खणून जागेचे संरक्षण केले जाते. यामुळे जनावरांपासून तसेच वणव्याच्या आगीपासून संरक्षण मिळते. पूर्वापार निवडुंग, काटेरी झुडपे, मोठे वृक्ष व मधे झुडपे अशी रचना करून आपली हद्द व आतील जागेचे संरक्षण करीत.

शेताच्या रक्षणासाठी वाळलेल्या काट्या व झाडोऱ्याचे कुंपण, काटेरी तारेचे कुंपण, दगडांचे कुंपण, भिंतींचे कुंपण करता येते. परंतु हे चारही प्रकारच्या कुंपणाकरिता आर्थिक खर्च अधिक येत असल्यामुळे ही कुंपणे सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडण्यासारखे नाहीत, त्याऐवजी शेतकरी सजीव कुंपणाची लागवड केल्यास फायद्यामध्ये राहतात.

वनस्पतींचे कुंपण बनवताना पुढील बाबींचा विचार करावा –

  • निवडलेल्या वनस्पती पुरेसे संरक्षण देऊ शकणाऱ्या असाव्यात,गुरांना या वनस्पती चारा म्हणून खाण्यास त्याज्य असाव्यात.
  • संरक्षणासाठी लावण्यात येणाऱ्या वनस्पती शक्यतो काटेरी असाव्यात.
  • निवडलेल्या वनस्पती शक्यतो किमान पाण्यावरही फोफावणाऱ्या असाव्यात.
  • त्यांची काटछाट आणि करावी लागणारी इतर देखभाल कमीतकमी असावी.
  • या वनस्पतीबहुपयोगी असाव्यात; त्यापासून कुंपणाव्यतिरिक्त आर्थिक मोबदला मिळावा.

सजीव कुंपणाच्या लागवड पद्धती –

१. समतल लागवड –

या पद्धतीमध्ये कमी उताराच्या किंवा सपाट शेतात खड्डे किंवा सऱ्या काढून लागवड करतात.

२. वरंबा पद्धती –

सर्वप्रथम ज्या शेताला कुंपण घालायचे आहे, अशा शेतात शेताच्या सीमेची चुना टाकून आखणी करावी. शेताच्या भोवती ओळीत एक मीटर अंतरावर १.५ बाय १.५ बाय १.५ फूट अंतरावर खड्डे तयार करावेत. खड्डे उन्हाळ्यात चांगले तापू द्यावेत. एक घमेले कुजलेले शेणखत, पालापाचोळा, शेतातील वरची माती याद्वारा खड्डे भरून घ्यावेत. दोन पाऊस पडल्यानंतर खड्ड्यांमध्ये रोपे लावावीत किंवा बिया टोकाव्यात, कलमे लावावीत. रोपांची लागवड झाल्यावर किंवा बिया, कलमे लागवड केल्यावर पुरेसे पाणी द्यावे. खड्ड्यांत रोपे किंवा बिया लावताना खड्ड्याच्या विरुद्ध व्यासावर दोन कोपऱ्यांत दोन झाडे लावावीत. दुहेरी पद्धतीत लागवड करताना पहिल्या रांगेतील दोन झाडांच्या मध्यावर दुसऱ्या ओळीतील झाड येईल, तसेच कुंपणाचा आकर्षकपणा कमी होणार नाही, याची काळजी घ्यावी. बहुधा अशी कुंपणे एकाच जातीची झाडे वापरून केली जात असली, तरी वेगवेगळ्या जातींची रंगीत पाने, फुले असणारी झाडे लावून कुंपणाच्या उद्देशाबरोबरच मोहकता आणता येते.

 

सजीव कुंपणाकरिता लागवड करता येणाऱ्या वनस्पती –

सागरगोटा 

सागरगोटय़ाची लागवड बियांपासून करतात. कुंपण हे एकसारखे होण्याकरिता याची लागवड दाट करावी लागते. या वनस्पतीच्या सर्वच भागांवर काटे असल्यामुळे व गुरेही ही झाडे खात नसल्याने संरक्षणासाठी सागरगोटा उत्तम. सागरगोटय़ाचे झुडूप अस्ताव्यस्त वाढणारे असल्याने बी रुजून वाढ होता होताच त्याला हवे तसे वळण द्यावे. बऱ्यापैकी वाढ झाल्यावर सागरगोटा अगदी कमी पाण्यावरही तग धरू शकतो. बिया प्लॅस्टिकच्या पिशवीत लावून, रोपे साधारण २५ ते ३० सें.मी. वाढल्यावरही लागवड करू शकतो. सागरगोटय़ाच्या बियांना औषधी गुणधर्म असल्याने त्या विकून काही प्रमाणात फायदाही होतो. सागरगोट्याचा वापर आयुर्वेदात कॅन्सरवर होतो.  इतरांनाही लागवडीसाठी बिया हव्या असल्यास त्या विकता येतील.

शिकेकाई 

शिकेकाई या काटेरी वनस्पतीचीही लागवड सागरगोटय़ाप्रमाणेच करावी. शिकेकाईच्या शेंगांना मागणी असल्याने त्या विकून काही प्रमाणात फायदाही होतो.

चिलार 

चिलार या काटेरी वनस्पतींचीही लागवड सागरगोटय़ाप्रमाणेच करावी. चिलार वनस्पतीला आकर्षक फुले येत असल्याने कुंपणाला सुशोभीकरणाचा पैलूही प्राप्त होतो.

चिकाचा निवडुंग –

चिकाचा निवडुंगाची लागवड छाटकलमांपासून करतात; मात्र ती पावसाळ्याच्या साधारण एक महिना आधी करावी, कारण याच्या खोडात पाण्याचा बऱ्याच प्रमाणात साठा असल्याने काप दिल्या ठिकाणी लगेचच पाण्याचा संपर्क झाल्यास छाटकलम कुजण्याची दाट शक्यता असते. चिकाचा निवडुंग काटेरी असतो आणि त्यामधून स्रवणाऱ्या चिकामुळे जनावरे त्याला तोंड लावत नाहीत. लागवडीआधी जमीन खोदून भुसभुशीत करून घ्यावी.

कृषिसमर्पण : कमी खर्चातील सजीव कुंपण - डॉ. विनायक शिंदे-पाटील, अहमदनगर आणि डॉ. सारिका वांद्रे, कोल्हापूर

मेहंदी व कडू मेहंदी (कडू कोयनेल) 

यांना बकरीसुद्धा खात नाही. घट्ट वाढते. आपण या कुंपणास छाटणी करून पाहिजे तसा आकार देऊ शकतो. हे कुंपण भराभर वाढते. मेंदी उभी वाढते, तर कडू मेंदी उभी-आडवी वाढते. या कडू मेंदीच्या पांढऱ्या, लांब बारीक फुलांवर बऱ्याच प्रकारची फुलपाखरे येतात. यास काटे नसतात, पण दाट वाढ होते. एकात एक फांद्या गेल्यामुळे याची जवळ जवळ जाळीच तयार होते. सहसा यातून आत कोणी गुरे येऊ शकत नाहीत. या कडू मेंदीला सारखी छाटणी करून आकार नियंत्रित करावा लागतो. पूर्वी हँगिंग गार्डनमध्ये जे वनस्पतीचे वेगवेगळे आकार तयार केले होते. त्यात लोखंडी सांगाडय़ावर ही कडू मेंदी वाढवीत व योग्य छाटणी करून विविध आकार देऊन वेगवेगळ्या प्राण्यांचे आकार येत.

निर्गुडी –

हे झुडूप अत्यंत काटक व पाण्याच्या दुर्भिक्षातही चांगल्या प्रकारे तग धरू शकते. गुरेढोरे, शेळ्यामेंढय़ाही या झुडपास तोंड लावत नाहीत. निर्गुडीचे तेलही सांधेदुखीवर रामबाण उपाय आहे. पाल्याची कपडय़ात पुरचुंडी करून तव्यावर गरम करून शेकून घेतल्यासही सांधेदुखीपासून आराम मिळतो. अफ्रिकन मिल्क बुशसारखीच छाटकलमे लावून, परंतु पाऊस नियमित सुरू झाल्यावरच लागवड करावी. निर्गुडीस आकाशी-निळ्या रंगाच्या चिमुकल्या फुलांचे तुरे येतात. निरगुडीचे तेल एक घरगुती उद्योग म्हणूनही सुरू करता येईल. निर्गुडीला निर्गुण्डी असेही नाव आहे.

करवंद –

भारतात करवंद ही वनस्पती दोन प्रकारची उपलब्ध आहे. जंगली करवंद म्हणजे व बागेतील लागावडीखालील करवंद. दोन्हीही झुडपे काटेरी आहेत आणि त्यांस गुराढोरांपासूनही उपद्रव होत नाही. मात्र, दोन्हीही जाती सावकाश वाढणाऱ्या आहेत. यांची लागवड बिया पेरून करावी कारण छाटकलमे जगण्याचे प्रमाण कमी असते. पाण्याची उपलब्धता असल्यास बिया कोणत्याही मोसमात पेरून लागवड करता येते. जंगली करवंदाच्या कच्च्या फळांचे आपण लोणचे करू शकतो. पिकलेली फळे खाऊही शकतो किंवा त्यांचे सरबतासाठी सिरप आणि मुरंबे करूनही साठवणीत ठेवू शकतो. बागेतील लागवडीच्या कच्च्या फळांपासूनही लोणचे बनवू शकतो; मात्र, पिकल्यानंतर ही खाण्यास चांगली लागत नाहीत. दोन्ही जातीच्या झाडांना पांढरी फुले येतात. त्या फुलांचा मनमोहक परिमळ परिसरभर दरवळतो.

घायपात –

घायपात ही काटेरी वनस्पती संरक्षक कुंपणांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. याची वाढ साधारण अननसाच्या झाडासारखी दिसते. या वनस्पतीला जमिनीलगतच काटेरी पाने फुटत असल्याने व त्यांची पाने चहुबाजूंनी पसरत असल्याने छोटय़ामोठय़ा जनावरांना शिरकाव करणे कठीण जाते. या वनस्पतीला जमिनीलगतच अनेक फुटवे उगवत असल्याने त्यांपासून जवळजवळ अभेद्य अशी कुंपणे बनवता येतात. यांची लागवड मात्र जमिनीतून उगवलेली छोटीमोठी रोपे लावूनच करावी लागते. घायपाताचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे, अनेक वर्षांनंतर हिला खूप उंच असा फुलांचा दांडा येतो. पण गंमत अशी की दांडय़ावर फुलांपेक्षा जास्त छोटी छोटी रोपेच धरतात. ही छोटुकली रोपे लावूनही आपण लागवड करू शकतो. असा फुलोरा आल्यानंतर मात्र हे झाड काही महिन्यांनंतर मरून जाते; परंतु त्याआधी सभोवताली अनेक घायपाताची रोपे उगवत असल्याने मेलेल्या घायपाताची जागा ती लवकरच भरून काढतात. त्यामुळे एकदा घायपाताची लागवड केल्यानंतर पुढील अनेक वष्रे कसलीही तसदी न देता ही आपल्याला संरक्षण पुरवत असते. घायपात अत्यंत कमी पाण्यावरही तग धरू शकतो. याची लागवड पावसाळ्याच्या सुरुवातीला करावी. घायपाताच्या पानांतून टसर रेशमासारखा धागा मिळतो. या धाग्यापासून अनेक शोभेच्या वस्तू बनवता येतात. येथे ब्रोमेलिया या अननसाच्या कुळातील एका वनस्पतीचा उल्लेख अनाठायी होणार नाही. ही वनस्पतीही पानांवर महाभयानक काटे धारण करणारी आहे. एकदा लावल्यावर ही वनस्पतीही जमिनीतून वाढणाऱ्या फुटव्यांमुळे पसरत जाते. ही वनस्पतीही एकदा फुले येऊन गेली की मरून जाते. परंतु, मरण्याआधी तिचे फुटवे तिची जागा घेण्यास तयारच असतात. ब्रोमेलियाची फुले आकर्षक नसली तरीही, फुलोरा यायच्या वेळी तिची मधली नवी पाने रक्तवर्णी होऊन फारच मनमोहक दिसतात. ही वनस्पतीही कमी पाण्यावर तग धरू शकते.

कृषिसमर्पण : कमी खर्चातील सजीव कुंपण - डॉ. विनायक शिंदे-पाटील, अहमदनगर आणि डॉ. सारिका वांद्रे, कोल्हापूर

हिरवा व पिवळा डुरांटा 

पिशवीमध्ये रोपे तयार करून याची लागवड करता येते. पावसाळा चांगला असला तर तीन महिन्यात ते चांगले वाढून दिवाळीपर्यंत २-३ फूट उंच होतात. याची पाने कडू व निमुळती असतात. याचा काटा अतिशय टोकदार व विषारी असतो. चुकून जर काटा बोटाला टोचला तर तो आठ दिवस ठणकतो. याची छाटणी केल्यानंतर दाट सुंदर एकसारखे कुंपण असे तयार होते. तेव्हा सर्व कंपाऊंडमध्ये हे कंपाऊंड जास्त प्रचलित व फायदेशीर आहे. याचे कंपाऊंड १५ वर्षापर्यंत राहते.

पिवळा डुरांटा हा पिवळसर रंगाचा असल्याने आणि याच्या काड्या क्रॉस करून लागवड केली म्हणजे दाट होते. हे गुडघ्यापासून ते छातीपर्यंत भक्कम कंपाऊंड तयार होते. विशेष म्हणजे याची कात्रीने छाटणी केल्यानंतर पालवी चांगली येते आणि याचा पिवळसर रंग बाँड्रीला आकर्षक वाटतो. शहरी किंवा निमशहरी भागातील उद्यानात या बॉर्डरचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

सुरू 

समुद्र किनाऱ्यालगत असणाऱ्या कुंपणाची गरज दोन प्रकारची असते. एक तर संरक्षणासाठी आणि दुसरे आपल्या बागेत लावलेल्या झाडांना समुद्रावरून वाहणाऱ्या खाऱ्या वाऱ्यापासून वाचवणे. सुरूची लागवड बिया पेरून करावी. सुरू वृक्षात नर आणि मादी असे दोन प्रकार असतात. ही झाडे साधारण दोन ते अडीच मीटर उंचीपर्यंतच वाढू द्यावीत. वरच्या बाजूस छाटणी करत रहिल्याने त्यांची गर्द वाढ होते. वनविभागाच्या रोपवाटिकेतून सुरूची रोपे किफायती दरामध्ये मिळतात.

भद्रक 

समुद्र किनारी, अगदी रेताड जागीसुद्धा सहज वाढणारी व दिसायलाही सुंदर अशी ही वनस्पती आहे. भद्रकाची लुसलुशीत, पिवळसर सोनेरी पाने फारच सुरेख दिसतात. भद्रकास पांढरी, छोटी फुले येतात. फुलांना हाताच्या बोटांप्रमाणे एकाच बाजूस पाकळ्या असतात.

कृषिसमर्पण : कमी खर्चातील सजीव कुंपण - डॉ. विनायक शिंदे-पाटील, अहमदनगर आणि डॉ. सारिका वांद्रे, कोल्हापूर

खैर –

कोकणात व जेथे जास्त पाऊस आहे. अशा ठिकाणी खैराचे कुंपण उपयुक्त ठरते. खैराचा काटा हा अतिशय टोकदार असतो. खैराचे उपयोग म्हणजे खौराजे सालीपासून कात बनवायचा कोकणामध्ये कुटीरोद्योग/लघुउद्योग आहे. चांगला दर्जेदार कात हा खैराच्या लाकडापासून केल्यास त्याला भाव चांगला मिळतो. म्हणून खैराची लागवड अती पाऊस पडणाऱ्या भागात सागापेक्षा फायदेशीर ठरते. खैर तोडताना मात्र जंगल खात्याची परवानगी लागते.

गुलाब –

गुलाबाचे डोळे ज्या जंगली काडीवर भरतात अशा ब्रायरची लागवड कुंपण म्हणून करता येते. वर्षातून २ वेळा एका झाडापासून ४० ते ५० कटींग्ज मिळून त्यापासून उत्पन्न मिळू शकते. याच काडीवर गुलाबचे डोळे जर भरले तर गुलाबाची कलमे विकता येतात. देशी गुलाबाच्या फुलापासून गुलाबाचे अत्तर, गुलकंद, गुलाब पाणी तयार करता येऊन गुलाबाच्या फुलांपासून मधाच्या पेट्या व मधमाश्या ठेवल्यास गुलाबापासून औषधी मध मिळवता येतो.

शेर –

हे झुडप चिकाच्या निवडुंगाच्या कुळातीलच आहे. याची लागवड ही चिकाच्या निवडुंगाप्रमाणेच करावी. या झुडपास काटे नसले तरीही, त्याच्या चिकामुळे गुरेढोरे त्यांस तोंड लावत नाहीत.

अफ्रिकन मिल्क बुश 

हे झुडप चिकाच्या निवडुंगाच्या कुळातीलच आहे. याची लागवड ही चिकाच्या निवडुंगाप्रमाणेच करावी. या झुडपास काटे नसले तरीही, त्याच्या चिकामुळे गुरेढोरे त्यांस तोंड लावत नाहीत. त्यापकी सायनाडेनियम (अफ्रिकन मिल्क बुश) हिच्या एका प्रकारात पानांवर लालसर-किरमिजी रंग उठून दिसतात; त्यामुळे ती शोभिवंतही दिसतात.

कृषिसमर्पण : कमी खर्चातील सजीव कुंपण - डॉ. विनायक शिंदे-पाटील, अहमदनगर आणि डॉ. सारिका वांद्रे, कोल्हापूर
सुबाभूळ  

सुबाभुळ ही उंच होते, परंतु याच्या बिया पडून जमिनी खराब होतात. काही प्रमाणात याच्या पाल्याचा उपयोग चारा म्हणून शेळ्या, मेंढ्यासाठी होतो. लाकूड जळणासाठी व शेती औजारांसाठी वापरले जाते.

घाणेरी –

याचे कंपाऊंड सहसा करण्याची गरज भासत नाही. खेडेगावात बाराही महिने बांधावर उगविलेले असते. याचे खोड ठिसूळ व काटे बारीक-बारीक पण विषारी असतात. त्यामुळे जनावरापासून शेताचे संरक्षण होते. हे झाड अतिशय काटक असून याची फांदी जरी पडली तरी ती जीव धरते. शेताला जर मोठे बांध असतील तर कमी वेळात कमी पैशात घनदाट कंपाऊंड पावसाळ्याच्या तीनच महिन्यात यापासून भक्कम स्वरूपात तयार होते. वर्षभरात छाटणीच्या बाबतीत याकडे लक्ष दिले गेले नाही तर हे कंपाऊंड तीन ते सहा फूट आडवी – तिडवी जागा व्यापते, त्यामुळे वहितीखालील जमीन वाया जाण्याची शक्यता असते.  घाणेरीला टणटणी असेही नाव आहे.

बांबू –

काही ठिकाणी पिवळ्या हिरव्या बांबूचे कंपाऊंड केले जाते. मात्र यामध्ये उंची वाढल्यानंतर सावली पडत असल्याने शेतातील काही क्षेत्रातील पिकाच्या वाढीवर याचा दुष्परिणाम होतो. त्यामुळे नाल्याच्या बाजूने पाण्यामुळे मातीची धूप होऊ नये म्हणून तेथे लावावे.

शेवरी  

शेवरीचे कुंपण पश्चिमेकडील वाऱ्यापासून सरंक्षण होण्यासाठी विविध फळबागांभोवती केले जाते. शेवरीचा पाला शेळ्यांना चारा म्हणून वापरला जातो.

कृषिसमर्पण : कमी खर्चातील सजीव कुंपण - डॉ. विनायक शिंदे-पाटील, अहमदनगर आणि डॉ. सारिका वांद्रे, कोल्हापूर

निलगिरी – 

निलगिरीचे कुंपण पश्चिमेकडील वाऱ्यापासून सरंक्षण होण्यासाठी विविध फळबागांभोवती केले जाते. निलगिरीच्या पाल्यापासून तेल काढले जाते.

बोगनवेल (कागदी फूल) –

बोगनवेलीच्या विविध जाती असून, जातीपरत्वे लाल, गुलाबी, पांढरी, पिवळी, केशरी अशा रंगांची फुले असणारे, सिंगल व डबल व मिश्रछटा असणारी फुले आणि झाडांवर काटे असतात. कागदी फुलांचा वापर बहुधा तारेच्या कुंपणाच्या आधाराने करतात; सततच्या छाटणीमुळे यांना झुडपांसारखा आकारही देता येतो.

लालवेणी (ऍकेलिफा

लाल रंगाची वेणी (फुले) येणारे झाड, हिरवी पाने, काही जातींमध्ये पिवळसर पांढरा रंग तर काहींमध्ये फुले गुच्छांमध्ये येतात.

तगर –

पांढऱ्या रंगाची फुले, हिरवीगार पाने, परंतु काही जातींमध्ये पानांवर पिवळ्या रंगाच्या रेषा असतात.

जास्वंद 

विविध आकार आणि रंगांची सिंगल आणि डबल फुले, दातेरी कडा असलेली हिरवी पाने, काही जाती पानांच्या बाबतीत पांढऱ्या किंवा पिवळ्या छटांसहित असतात.

अलमंडा –

पिवळ्या रंगाची, घंटेच्या आकाराची, सुवासिक मोठी फुले येतात. अलमंडाचा वापर बहुधा तारेच्या कुंपणाच्या आधाराने करतात; सततच्या छाटणीमुळे यांना झुडपांसारखा आकारही देता येतो.

कृषिसमर्पण : कमी खर्चातील सजीव कुंपण - डॉ. विनायक शिंदे-पाटील, अहमदनगर आणि डॉ. सारिका वांद्रे, कोल्हापूर

सजीव कुंपणाचे फायदे –

  • आपली स्थावर मालमत्ता अधोरेखित करून ठेवता येते.
  • सजीव कुंपणामुळे शेतातील पिकांचे मोकाट व जंगली जनावरांपासून संरक्षण होते.
  • सजीव कुंपण विंड ब्रेकची भूमिका पार पाडते. उन्हाळा ऋतूमध्ये उष्ण वाऱ्याचा वेग कमी होऊन पिकांची वाढ जोमाने होण्यास मदत होते तसेच शेतमालाच्या नुकसानीमध्ये घट होते.
  • सजीव कुंपणामुळे शेतातील पिकांच्या एकंदरीत उत्पादकतेत भर पडते.
  • कुंपणाकरिता सापळा पिकांचा वापर करून पिक संरक्षण अधिक कार्यक्षमपणे व कमी खर्चात करता येते.

वरील माहिती व चित्र हे डॉ. विनायक शिंदे-पाटील, अहमदनगर आणि डॉ. सारिका वांद्रे, कोल्हापूर यांचे मूळ लेखातून घेतले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *