जैविक कीड व्यवस्थापन – काळाची गरज ….

जिवो जीवस्य जीवनम” हे निसर्गाचे अबाधित व अटळ चक्र आहे. या संपूर्ण नैसर्गिक तंत्राचा वापर पिकातील किडीच्या नियंत्रणासाठी करणे शक्य आहे. यालाच जैविक कीड नियंत्रण असे म्हणतात. ते जाणून घेऊन त्याचा पिकाच्या संरक्षणासाठी वापर करावा.

रासायनिक कीटकनाशकांच्या वापरावर विविध कारणाने मर्यादा येत आहेत. अशा वेळी एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा अवलंब करण्याचा सल्ला दिला जातो. त्यात जैविक कीड नियंत्रणाला मोलाचे स्थान आहे. ही पर्यावरणपूरक पद्धत असून, त्यात जिवो जीवस्य जीवनम या नैसर्गिक जीवनचक्राचा डोळसपणे वापर केला जातो. शास्त्रज्ञांनी पिकातील किडीवर उपजीविका करणाऱ्या, किडीचे नैसर्गिक शत्रू (परोपजीवी व परभक्षी कीटक), रोगजंतू घटक (जिवाणू, विषाणू, बुरशी ई.), सूत्रकृमी व वनस्पतिजन्य घटकांची ओळख पटवली आहे. अशा शेतीच्या दृष्टीने मित्र कीटकांची ओळख जाणून घेऊन, त्याचे शेतामध्ये संवर्धन केल्यास जैविक कीड नियंत्रणाला चालना मिळते. यामुळे पर्यावरणाचा समतोल राखणे शक्य होते.

जैविक नियंत्रणातील महत्त्वाचे मित्रकीटक

अ) परोपजीवी कीटक:

हे यजमानापेक्षा (नुकसानकारक किडींपेक्षा) आकाराने लहान व चपळ असतात. परोपजीवी कीटकांचा जीवनक्रम पूर्ण करण्यासाठी एकच यजमान पुरेसा असतो.हे मित्रकीटक नुकसानकारक किडींपेक्षा आकाराने लहान व चपळ असतात. किडीच्या अंगावर किंवा शरीरामध्ये राहून त्यांना ते हळूहळू खातात व मारतात. यातील काही कीटक असे.

  1. ट्रायकोग्रामा – या परोपजीवी कीटकाच्या अनेक प्रजाती नुकसानकारक किडींचे जैविक नियंत्रण करताना आढळतात. त्यापैकी ट्रायकोग्रामा चिलोनीस ही प्रजाती जैविक नियंत्रणातील एक मुख्य उदाहरण आहे. या परोपजीवी कीटकांचा उपयोग ऊस, भात, मका व ज्वारीवरील खोडकिडी, कांडी कीड, कपाशीवरील बोंड अळी, भाजीपाला पिकांवरील शेंडा व फळे पोखरणारी अळी, घाटे अळी, डाळिंबावरील सुरसा, कोबीवरील चौकोनी ठिपक्याचा पतंग आदी किडींच्या नियंत्रणासाठी होतो.
    प्रसारण : एका ट्रायकोग्रामा कार्डवर सुमारे २० हजार परोपजीवीयुक्त अंडी असतात. अशा ट्रायकोकार्ड्सचे २ ते ४ प्रति एकर प्रमाणात तर प्रौढांचे २०,००० प्रौढ/एकर याप्रमाणे प्रसारण करावे. किडीच्या प्रादुर्भावानुसार आठवड्याच्या अंतराने ४ ते ५ प्रसारणे करावीत.
  2. चिलोनस या परोपजीवी कीटकांचा उपयोग बटाट्यावरील पाकोळी, कपाशीवरील बोंड अळी व अन्य पतंगवर्गीय किडींच्या नियंत्रणासाठी होतो. या परोपजीवी कीटकाची चिलोनस ब्लॅकबर्नी ही प्रजाती परिणामकारक आहे.
    प्रसारण – 50 हजार ममीज प्रति हेक्टर.प्रसारण- गरजेनुसार तीन ते चार प्रसारणे करावीत.
  3. एनकार्शिया* – हे कीटक भाजीपाला, फळपिके, फुलपिके व पॉलिहाऊसमधील पिकांवरील रस शोषक किडी (उदा. पांढरी माशी, मावा, उसावरील लोकरी मावा) आदींच्या नियंत्रणासाठी उपयुक्त आहेत.
    प्रसारण – नुकसानकारक किडींचा प्रादुर्भाव दिसू लागताच त्यांचे प्रसारण करावे.
  4.  एपिरिकॅनिया – हे मित्रकीटक उसावरील नुकसानकारक पायरिला या किडीच्या पिल्ले व प्रौढ अवस्थांवर परजीवीकरण करतात. या मित्रकीटकांमुळे पायरिलाचे अत्यंत प्रभावी नियंत्रण होते.
    प्रसारण – 50 हजार अंडी किंवा 5000 कोष प्रति हेक्टर. गरजेनुसार पुढील प्रसारणे करावीत.
  5. अपेंटॅलीस (कोटेशिया) – भाजीपाला पिकातील शेंडा व फळे पोखरणारी अळी, उसावरील खोडकीड, कांडी कीड, हेलिकोव्हर्पा आर्मिजेरा (घाटे अळी किंवा बोंड अळी) आदींच्या नियंत्रणासाठी या कीटकांचा उपयोग होतो.
    प्रसारण – 50 हजार प्रौढ प्रति हेक्टर
  6. ब्रेकॉन  – कापसावरील बोंड अळी, बटाट्यावरील पाकोळी, भेंडीवरील शेंडा व फळे पोखरणारी अळी, भात, मका व उसावरील खोड किडा, नारळावरील काळ्या डोक्याची अळी व अन्य पतंगवर्गीय किडींच्या नियंत्रणासाठी यांचा उपयोग होतो.
    प्रसारण – 50 हजार प्रौढ प्रति हेक्टर
  7. कोपिडोसोमा – हे मित्रकीटक बटाट्यावरील पाकोळीच्या जैविक नियंत्रणासाठी अत्यंत उपयुक्त आहेत.
    प्रसारण – 5000 अळ्या प्रति हेक्टर. गरजेनुसार चार ते पाच वेळा प्रसारणे करावीत.
  8. एनासियस – हे परोपजीवी कीटक सध्या जैविक नियंत्रणातील महत्त्वाचे उदाहरण आहे. कपाशीमध्ये सन 2007 पासून मोठ्या प्रमाणात उपद्रव करून नुकसान करणाऱ्या पिठ्या ढेकूण (मिलीबग) या किडीच्या नैसर्गिक नियंत्रणात या कीटकांचा मुख्य सहभाग होता.

ब) परभक्षी कीटक –

हे कीटक नुकसानकारक किडीपेक्षा आकाराने मोठे व सशक्त असतात. एक परभक्षी कीटक त्याच्या जीवनात अनेक किडींचा नायनाट करतो.

  1. लेडी बर्ड बीटल (ढाल किडे) –  हे परभक्षी कीटक बहुतांश पिकांवरील रस शोषण करणाऱ्या मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुलकिडे व पिठ्या ढेकूण आदी किडींवर उपजीविका करतात. मका, ज्वारी, कापूस, ऊस, कडधान्ये, भाजीपाला इत्यादी पिकांवर हे मित्रकीटक मोठ्या प्रमाणावर आढळतात. यांच्या अनेक प्रजाती आढळून येतात.
    प्रसारण – 2500 प्रति हेक्टर
  2.  ग्रीन लेस विंग- अर्थात क्रायसोपर्ला (हिरवा जाळीदार पतंग) – या कीटकाच्या अळी व प्रौढ अवस्था या मावा, पांढरी माशी, तुडतुडे, कोळी, फुलकिडे, पिठ्या ढेकूण, खवले किडी यांच्या सर्व अवस्था व बोंड अळीची अंडी, प्रथमावस्थेतील अळ्या खातात. हे कीटक कापूस, मका, कडधान्ये व भाजीपाला पिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतात.
    प्रसारण – 5000 अंडी प्रति हेक्टर किंवा 10 हजार अळ्या प्रति हेक्टर
  3. प्रार्थना कीटक–  हे मित्र कीटक निसर्गत आढळून येतात. हे कीटक पतंगवर्गीय किडींच्या अळ्या खाऊन त्यांची संख्या नियंत्रित ठेवतात.
  4. डिफा (कोनोबाथ्रा) एफिडीव्होरा हे कीटक जैविक नियंत्रणातील उत्कृष्ट उदाहरण आहेत. उसावरील लोकरी माव्याच्या प्रभावी जैविक नियंत्रणासाठी यांचा उपयोग होतो. पूर्ण विकसित अळी 300 पेक्षा जास्त मावा किडी खाते. एक अळी पानावरील लोकरी मावा तीन ते पाच दिवसांत संपवते.
    प्रसारण – लोकरी माव्याचा प्रादुर्भाव दिसून येताच 50 कोष प्रति गुंठा किंवा 1000 अळ्या प्रति हेक्टर सोडाव्यात.
  5. परभक्षी कोळी (एम्ब्लीसियस) – हे कीटक भाजीपाला, फुलझाडे व पॉलिहाऊसमधील पिकांवर नुकसान करणाऱ्या लाल कोळी व दोन ठिपक्यांच्या कोळी नियंत्रणासाठी अत्यंत उपयुक्त आहेत.
  6. सिरफीड माशी – या परभक्षी कीटकांची अळी मुख्यतः मावा या रसशोषक किडीला फस्त करतात. या कीटकांचा उपयोग ऊस, ज्वारी, मका, भाजीपाला पिकांमध्ये होतो. हे कीटक निसर्गतः मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात.

 

जैविक कीटकनाशके /बुरशी 

परोपजीवी बुरशी/ बुरशी जन्य कीटकनाशके

निसर्गात काही बुरशी आहेत ज्या किडींवर उपजीविका करून व त्या किडींना रोगग्रस्त करून मारतात व किडींचे नियंत्रण करतात, अशा बुरशींना कीटकांवरील परोपजीवी बुरशी व त्यापासून तयार केलेल्या जैविक कीटकनाशकांना बुरशी जन्य कीटकनाशके म्हणतात. बिव्हेरिया बॅसियाना, न्यूमोरीया रिले, मेटारायझियम एनीसोप्ली, व्हर्टीसीलियम लेकॅनी इत्यादी प्रमुख परोपजीवी बुरशी जैविक कीड व्यवस्थापनामध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जातात.
सुरवातीला किटकाच्या त्वचेवर लहानसा ठिपका दिसतो. रोगबाधीत कीटक बैचेन होऊन हालचाल मंदावते. मरण पावलेले कीटक कडक होतात. किटकाच्या बाह्य शरीरावरदेखील बुरशीची वाढ होते.

१) व्हर्टीसिलीयम लेकॅनी : ही बुरशी रस शोषक किडी उदा. मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी, लाल कोळी, पिठ्या ढेकुण व खवले कीड या मृदू शरीरवर्गीय किडींच्या नियंत्रणासाठी उपयुक्त आहे. फळझाडांवरील पिठ्या ढेकुण व उसावरील लोकरी मावा, पांढरी माशीच्या जैविक नियंत्रणासाठी ही एक प्रभावी बुरशी आहे.
प्रमाण : ५ ग्रॅम/लिटर पाणी किंवा ०.८ ते १ किलो/एकर (फवारणीसाठी).

१ किलो व्हर्टीसिलीयम लेकॅनी पावडर ५ लिटर पाण्यात मिसळून ४ ते ६ तास भिजवून नंतर वस्त्रगाळ करून घ्यावे. दुसऱ्या ५ लिटर कोमट पाण्यात मिसळून घ्यावे. थंड झाल्यास दोन्ही द्रावणे एकत्र करून ४० मिली स्टीकर/स्प्रेडर मिसळावे. सदर १० लिटर द्रावणात १९० लिटर पाण्यातून मिसळून १ एकर क्षेत्रावर फवारणीसाठी वापरावे. शेतात किडीचा प्रादुर्भाव दिसू लागताच पहिली फवारणी करावी. किडीचे प्रमाण कमी होईपर्यंत १० दिवसांच्या अंतराने २ ते ३ वेळा फवारणी करावी. या बुरशीच्या वाढीस ९० टक्के सापेक्ष आर्द्रता व २० ते २५ अंश सेल्सिअस तापमान उपयुक्त ठरते.

२) बिव्हेरिया बॅसियाना : ही बुरशी पतंगवर्गीय किडी, भुंगेरे, हुमणी, सोंडकिडे, पाने खाणारी अळी, पाने गुंडाळणारी अळी, घाटेअळी, केसाळ अळी, वाळवी इ.च्या नियंत्रणासाठी उपयोगी आहे.
प्रमाण : ५ ग्रॅम/लिटर पाणी, ०.८ ते १ किलो एकरी (फवारणीसाठी) किंवा ८ किलो/एकरी (जमिनीतून).

३) मेटारायझीयम अॅनिसोप्ली : या बुरशीचा उपायोग पाने खाणारी अळी, पाने गुंडाळणारी अळी, घाटे अळी, केसाळ अळी, पायरीला, खोडकीड, हुमणी, वाळवी इ. ३०० प्रकारच्या किडींच्या नियंत्रणासाठी होतो.
प्रमाण : ५ ग्रॅम/लिटर पाणी, ०.८ ते १ किलो एकरी (फवारणीसाठी) किंवा ८ किलो/एकरी (जमिनीतून).

४) न्युमोरीया रीलाई : ही बुरशी मुख्यत्वे सोयाबीन, बटाटा, कापूस व इतर पिकांवर येणाऱ्या स्पोडोप्टेरा व इतर अळ्यांच्या प्रभावी नियंत्रणासाठी उपयुक्त आहे.
प्रमाण : प्रमाण : ५ ग्रॅम/लिटर पाणी, ०.८ ते १ किलो एकरी (फवारणीसाठी).

५) पॅसिलोमायसीस लीलासिनस : पिकामध्ये मुळांवर गाठी करून नुकसान करणाऱ्या सूत्रकृमींच्या नियंत्रणासाठी ही बुरशी वापरतात.
प्रमाण : १० ग्रॅम/किलो बियाणे (बीजप्रक्रीयेसाठी), ५० ग्रॅम/झाड (आळवणीसाठी) किंवा ४ किलो/एकरी शेणखतासोबत १:४० या प्रमाणात. जमिनीतून देण्यासाठी १० किलो पॅसिलोमायसीस पावडर ४०० किलो शेणखतात मिसळून त्यावर १ किलो गुळाचे द्रावण करून शिंपडावे. ४ ते ६ तासांपर्यंत तसेच ठेवावे. त्यानंतर जमिनीतून गादी वाफ्यावर मिसळून किंवा फळझाडांना रिंग पद्धतीने द्यावे. वर्षातून किमान दोनवेळा (६ महिने अंतराने) द्यावे..

६) ट्रायकोडर्मा : या बुरशीचा उपयोग जमिनीत वाढणाऱ्या मर, मूळकुज, खोडकुज, रॉट इ. रोगकारक बुरशी उदा. पिथियम, फ्युजारीयम, स्क्लेरोशियम, रायझोक्टोनिया, फायटोप्थोरा, कॉलेटोट्रिकम, बोट्रायटीस इ.च्या नियंत्रणासाठी होतो.
प्रमाण : २५० ग्रॅम/१० किलो बियाणे (बीजप्रक्रिया), २० ते २५ ग्रॅम/ १० लिटर पाणी ,४०० ते ८०० ग्रॅम/एकरी (फवारणीसाठी), ५० ग्रॅम/झाड (आळवणीसाठी), २ किलो प्रति एकरी (जमिनीमधून).

 

परोपजीवी विषाणू (विषानुजन्य कीटकनाशके) –

निसर्गात काही विषाणू आहेत जे किडींवर उपजीविका करून त्या किडींना रोगग्रस्त करून मारतात व किडींचे नियंत्रण करतात, अशा विषाणूला कीटकांवरील परोपजीवी विषाणू व त्यापासून तयार केलेल्या जैविक कीटकनाशकांना विषाणूजन्य कीटकनाशके म्हणतात. घाटेअळीचा विषाणू (HaNPV), लष्करी अळीचा विषाणू (SlNPV), उसावरील खोडकिडीचा ग्रॅनूलिसीस विषाणूसारखे परोपजीवी विषाणू जैविक कीड व्यवस्थापनामध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जात असून, ते विशिष्ट किडींवरच जगतात. अळीच्या शरीरात विषाणूची लागण झाल्यास विषाणूची वाढ सुरु होते. विषाणूच्या वाढीसाठी लागणारे अन्नघटक उदा. प्रथिने हे अळीच्या शरीरातील पेशीतून शोषून घेतले जातात. कीटकाच्या शरीरातील सर्व पेशी नष्ट होतात.

१) एचएएनपीव्ही (HaNPV) : या विषाणूचा वापर घाटेअळी, शेंगा पोखरणारी अळी, फळे पोखरणारी अळी, कळी व बी खाणारी अळी, बोंडअळी इ.च्या नियंत्रणासाठी हरभरा, तूर, टोमॅटो, कापूस, सुर्यफुल इ. पिकामध्ये होतो.
प्रमाण : हरभऱ्यावरील घाटेअळी, तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीसाठी २०० मिली/एकर, टोमॅटोवरील फळे पोखरणाऱ्या अळी, सूर्यफुलाच्या फुल व बी खाणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी १०० मिली/एकर, कपाशीवरील बोंडअळीच्या नियंत्रणासाठी २०० मिली/एकर.

HaNPV | स्वदेशी खेती

२) एसएलएनपीव्ही : या विषाणूचा उपयोग पाने खाणारी अळीच्या (स्पोडोप्टेरा) नियंत्रणासाठी सोयाबीन, कापूस, एरंडी इ. पिकांमध्ये होतो.
प्रमाण : सोयाबीन, कापूस, एरंडी इ. पिकामध्ये पाने खाणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी १०० ते २०० मिली/एकर.
३) एसएएनपीव्ही : केसाळ अळीच्या नियंत्रणासाठी या विषाणूचा उपयोग होतो.
प्रमाण : सुर्यफुल, भुईमुग पिकावरील केसाळ अळीच्या नियंत्रणासाठी २०० मिली/एकर.

 

परोपजीवी सूत्रकृमी :

निसर्गतःच मातीमध्ये हेट्रोरॅबडीटीस इंडिका, स्टेनरनेमा कार्पोकाप्सीसारखे काही परोपजीवी सूत्रकृमी असतात. हे सूत्रकृमी घाटे अळी, लष्करी अळी, हुमणी अळी व इतर पतंगवर्गीय किडींवर जगतात. त्यामुळे या सूत्रकृमीची जैविक कीटकनाशके तयार करून त्यांचा वापर कीड नियंत्रणामध्ये केला जातो. स्टेरनेमा व हिटरो-हॅब्डीटीस प्रजाती. यांचा उपयोग हुमणी, खोडकीड, घाटेअळी, नारळावरील काळ्या डोक्याची अळी,, बटाट्यावरील पाकोळी, तंबाखूवरील पाने खाणारी अळी इ.च्या नियंत्रणासाठी होतो.
प्रमाण : ४०,००० रोगकारक सूत्रकृमी/एकर.

 

परोपजीवी जिवाणू (जिवाणूजन्य कीटकनाशके)

बुरशी व विषाणूप्रमाणेच काही परोपजीवी जिवाणू असतात, जे किडींवर जगतात, त्यामुळे किडींना रोगग्रस्त होऊन मरतात, अशा जिवाणूला कीटकांवरील परोपजीवी जिवाणू व त्यापासून तयार केलेल्या जैविक कीटकनाशकांना जिवाणूजन्य कीटकनाशके म्हणतात. बॅसीलस थुरिंजीएनसिस, फोटोरॅबडस लुमिनेसन्ससारखे जिवाणू घाटे अळी, लष्करी अळी, फळभाज्यावरील शेंडा व फळ पोखरणारी अळी, कोबीवरील किडी व इतर पतंगवर्गीय किडींच्या प्रभावी व्यवस्थापनाकरिता मोठ्या प्रमाणात वापरली जातात.

१) बॅसिलस थुरीनजेन्सीस (बीटी) : या जीवाणूंचा उपायोग पतंगवार्गीय किडी उदा. कापसावील बोंडअळी, घाटेअळी, कोबीवरील चौकोनी ठिपक्याचा पतंग, पाने गुंडाळणारी अळी, तंबाखूवरील अळी आदीच्या नियंत्रणासाठी होतो. भाजीपाला, नगदी पिके, फळझाडे, फुलझाडे इ. पिकांमध्ये वापर करता येतो.

प्रमाण : ०.८ ते १ किलो/एकर फवारणीसाठी वापरावे.

स्यूडोमोनास फ्लोरेसेंस का उपयोग खेती में कैसे करें - दैनिक जाग्रति

२) स्युडोमोनास फ्ल्युरोसंस : याचा उपयोग सर्व पिकांवरील बुरशीजन्य व जीवाणूजन्य कुज, मूळकुज, फळकुज, पानांवरील ठिपके इ. रोगांच्या नियंत्रणासाठी होतो. डाळींबावारील नुकसानकारक तेलकट डाग रोगाच्या नियंत्रणासाठी हा जीवाणू अत्यंत उपयुक्त आहे.

प्रमाण : १० ग्रॅम/किलो बियाणे (बीजप्रक्रीयेसाठी), २५ ग्रॅम/१० लिटर (फवारणीसाठी) किंवा ४ किलो/एकर जमिनीमधून फवारणीसाठी, ०.५ ते १ किलो स्युडोमोनास पावडर ५ लिटर पाण्यात मिसळून घ्यावी. हे द्रावण गाळून घेतल्यानंतर ४० मिली स्टीकर/स्प्रेडर मिसळावे. हे द्रावण १९५ लिटर पाण्यात मिसळून १ एकर क्षेत्रावर वापरावे. जमिनीतून वापरासाठी २ किलो स्युडोमोनास शेणखतात मिसळून जमिनीत द्यावे. रोगाचा प्रादुर्भाव दिसताच ८ ते १० दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. जमिनीत देताना वर्षातून किमान २ वेळा (३ महिने अंतराने) द्यावे.

NPK जिवाणू  

नत्र स्थिर करणारे जिवाणू : यात चार प्रकारचे नत्र स्थिर करणारे जिवाणू आहेत. हे हवेतील मुक्त नत्र शोषून घेवून पिकांना उपलब्ध करून द्यायचे काम करतात.

  • सहयोगी जिवाणू:–ऍसिटोबॅक्टर आणि रायझोबियम यांचा समावेश होतो. यांना नत्र स्थिर करण्यासाठी रोपांची गरज असते.हे रोपांच्या मुळात शिरून मुळावर गाठी निर्माण करतात व त्याद्वारे नत्र स्थिर करतात.
  • सह-सहयोगी :-या पध्द्तीत जिवाणू अझोस्पायरीलम मुळामध्ये प्रवेश करून नत्र स्थिर करतात.
  • असहयोगी :—या प्रकारात जिवाणू अॅझोटोबॅक्टर जमिनीत स्वतंत्र राहून नत्र स्थिर करतात. यांच्या वापरामुळे रासायनिक खतामध्ये 25-30% बचत होते.

स्फुरद विरघळवणारे जिवाणू : 

  • बॅसिलस मॅगाटेरीयम व्हार फाॅस्फरियम हे जमिनीतून सेंद्रिय कर्बावर जगून वाढीदरम्यान सेंद्रिय आम्ल तयार करून जमिनीतील फाॅस्फरस विरघळवण्याचे कार्य करून पिकांना उपलब्ध करण्याचे काम करतात. यांच्या वापरामुळे मुळांची वाढ होण्यास मदत होते. तसेच वाढ होणारे हार्मोन तयार करतात.यांच्या वापरामुळे रासायनिक खतांची 25-30% बचत होते.
  • थायोबॅसिलस थायोक्सीडन्स् हे जमिनीतील स्थिर सल्फर विद्राव्य करून पिकांना उपलब्ध करून द्यावयाचे काम करतात.(सल्फेट फाॅर्म) या प्रक्रियेला ऑक्झीडेशन प्रोसेस म्हणतात. 2S + 3O2 + H2O –> 2H2SO4 .या जिवाणूमुळे जमिनीचा जास्त पी.एच कमी करण्यास मदत होते. यामुळे पिकांच्या फळांची गोडी, रंग येण्यास मदत होते.

पोटॅश सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया:
हे जिवाणू फ्रच्युरिया ऑरेन्शिया* जमिनीत वाढ होत असताना जमिनीतील पोटॅश विघटन करण्याचे काम करतात व पोटॅश जमिनीत उपलब्ध स्वरूपात पिकांना पुरवितात. यामुळे पिकांचे उत्पादन, रोगप्रतिकारशक्ती, रंग, साठवणूक क्षमता वाढते. यामुळे रासायनिक खतांची 25-30% बचत होते.

परोपजीवी सूत्रकृमी (सूत्रकृमीजन्य कीटकनाशके)-

तणांवरील परभक्षी किटक :
१) निकोचिटानस सोंड कीडे : प्रौढ कीटक जलपर्णीच्या शेंड्यांमध्ये जाऊन आतील गर खातात व पानांना छिद्रे पाडतात. हे किडे जलपर्णीग्रस्त तलावात प्रादुर्भावानुसार सोडावेत.

या प्रकारे करा गाजर गवतावर नियंत्रण. काँग्रेस गवत पांढरफुली. मेक्सिकन भुंगे.गाजर घास प्रबंधन - YouTube
२) झायगोग्रामा भुंगेरे : हे भुंगेरे गाजर गवतावर राहून कळ्या, पाने, फुले खातात.

वनस्पतिजन्य औषधी :

  • कडूनिंब – कडूनिंबामध्ये अॅझाडीरॅक्टीन, निंबीन, निंबीसीडीन व सॅलीसीन इ. रसायानिक घटक असतात. परंतू, त्यातील अॅझाडीरॅक्टीन हा घटक किडींच्या विरोधात परावृत्त, भक्षणरोधक, अंडी घालण्यास व्यत्यय, वाढीवर पारीनाम, कात टाकण्यावर परिणाम व आयुष्य कमी करण्याची कार्यक्षमता असते.
  • तंबाखू : तंबाखूवरील निकोटीन हा घटक स्पर्शविष, जठरविष व श्वासाचे विष म्हणून कार्य करते.
  • सीताफळ : सिताफळातील अॅसीयेजेनीन हे रसायन व अॅकोरीन, अॅनोनीन इ. अल्कोलोइड्समध्ये कीड व रोगरोधक गुणधर्म असतात.
  • शेवंतीमधील पायरेथ्रम – पायरेथ्रम हा घटक किडीचे नियंत्रणासाठी उपयुक्त आहे.
  • या प्रमाणेच हळद, मिरची, वेखंड, निलगिरी, शेवगा, धोतरा, निर्गुडी, रुई इ. वनस्पतींचा वापर जैविक नियंत्रणात करता येतो.

जैविक नियंत्रके वापरताना…..

  •  सामान्यतः प्रत्येक जैविक नियंत्रक हे एका विशिष्ट कीड किंवा रोगापुरतेच प्रभावी असते. उदा. ट्रायकोग्राम हा परोपजीवी कीटक त्याच्या यजमान किडीच्या फक्त अंडी अवस्थ्येतच परोपजीवीकरण करतो. किडीच्या अन्य अवस्थांवर तो परिणाम करत नाही.
  •  किडीमध्ये रोग उत्पन्न करणारे विषाणू हे ज्या-त्या किडीच्या अळीसाठीच खास प्रभावी असतो.
  •  किडीच्या वर्गाप्रमाणे खास प्रजातींचा वापर केल्यास जास्त व योग्य परिणाम मिळतात.
  •  परभक्षी कीटकांच्या यजमान किडी (खाद्य/भक्ष) योग्य प्रमाणात असेल तर ते शेतात व्यवस्थित स्थिरावतात व नैसर्गिकरित्या त्यांची संख्या जोमाने वाढते.
  •  जैविक नियंत्रकांना २५ ते ३० अंश सेल्सिअस तापमान खूप अनुकूल असते.
  •  बुरशीजन्य कीटकनाशकांच्या फवारणीअगोदर व फवारणीनंतर किमान एक आठवड्यापर्यंत अन्य रासायनिक कीटकनाशके, बुरशीनाशके फवारणे टाळावे.
  •  जीवाणू, बुरशी, विषाणू किंवा कृमी आधारित जैविक कीटकनाशके कायम थंड व कोरड्या जागेवर साठवल्यास त्यांची गुणवत्ता टिकून राहते.
  •  जैविक नियंत्रकांच्या चांगल्या परिणामांसाठी त्यांची वापरण्याची मुदत संपण्याआधी वापर करावा.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *