कोरडवाहू शेती : तंत्रज्ञान वापरून कमी पाण्यात करा शेती…

कोरडवाहू शेती – महाराष्ट्र राज्यात कोरडवाहू शेतीचे जवळपास ८५  टक्के क्षेत्र आहे. पावसाची सरासरी ७५० मि.मी. पेक्षा कमी असलेला भाग म्हणजे अवर्षण प्रवण क्षेत्र. ज्यामध्ये मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील बरेचशे क्षेत्र येते. तर परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यातील बहुतांश भाग निश्चित पावसाच्या प्रदेशात येतो. पावसाची उशिरा सुरुवात व अपुरी मात्रा पिक वाढीच्या कालावधीत ३ – ५ आठवड्यांचा खंड हे बदलत्या हवामानाची वैशिष्ट आहे. अशा परिस्थितीत कोरडवाहू शेतीचे उपयुक्त तंत्र वापरुन काही अंशी निश्चित उत्पादन मिळविता येते. नैसर्गिक घटक जसे जमीन, पाणी, सुर्यप्रकाश व हवा इत्यादींचा कार्यक्षम उपयोग करुन घेण्यासाठी जमिन व्यवस्थापन आणि पिक पद्धतीचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. कोरडवाहू शेतीच्या सुधारीत तंत्रज्ञानाची माहिती खालीलप्रमाणे आहे.

 

नैसर्गिक साधनसामुग्रीचे नियोजन :

  • पेरणी योग्य पाऊस होतच (७५ ते १०० मि.मी.) पेरणी करावी. पाऊस उशिरा सुरु झाल्यास आपत्कालीन पीक नियोजन अवलंबवावे.
  • धुळ पेरणी करिता २५ टक्के क्षेत्रावर ज्वारी, मूग, उडीद सारख्या पिकांची निवड करावी.
  • पेरणीपुर्व मशागत, आंतरमशागत, एकात्मीक अन्नद्रव्ये व्यवस्थापन, एकात्मीक तण नियंत्रण व पिक संरक्षण बरोबर शेतपातळीवर जलसंधारणाकरीता परिस्थितीनुरुप योग्य मुलस्थानी जलसंधारण पद्धतीचा अवलंब करावा.
  • मृद व जलसंधारण करण्याकरीता बांध बंदिस्ती, ओघळ व नाल्याचे उपचाराची निगराणी व दुरुस्ती पावसाळ्यापुर्वीच करण्यात यावी.
  • अतिवृष्टी दरम्यान शेतात साचलेले पाणी लवकरात लवकर शेताबाहेर काढण्यात यावे.

 

पीक व्यवस्थापन

  • जमिन व पाऊसमानानुसार पीक पद्धती निवडावी.
  • मध्यम ते भारी जमिनीत कापूस, तूर, खरीप ज्वारी व सोयाबीन सारखी पिके घ्यावीत.
  • हमखास पावसाच्या क्षेत्रात मध्यम ते भारी जमिनीकरीता दुबार पीक पद्धतीचा अवलंब करावा. यामध्ये मूग – रबी ज्वारी, संकरीत ज्वारी, सोयाबीन व करडई / हरभरा पिकांचा समावेश करावा.
  • मध्यम जमिनीत सूर्यफुल, तूर, बाजरी, सोयाबीन, ज्वारी सारखी पिके घ्यावीत.
  • हलक्या जमिनीत बाजरी, कुलथी, तीळ, कारळ, एरंडी सारखी पिके घ्यावीत.
  • आंतरपिक पद्धतीमध्ये संकरित ज्वारी व तूर (४:२), बाजरी व तूर (३:३), सोयाबीन व तूर (४:२), कापूस व उडीद / सोयाबीन (१:१) पिक पद्धतीचा अवलंब करावा.
  • आवश्यकतेनुसार आपत्कालीन पीक नियोजन करावे.
  • लवकर येणाऱ्या वाणांची निवड करावी. बियाण्याचे योग्य प्रमाण ठेवावे व बीजप्रक्रिया करावी.
  • झाडांची योग्य संख्या ठेवावी, त्याकरीता पिकांच्या दोन ओळी तसेच दोन झाडात योग्य अंतर ठेवावे.
  • अन्नद्रव्यांचे एकात्मिक व्यवस्थापन करावे व एकात्मिक किड व रोग नियंत्रण करावे.
  • एकात्मिक तण नियंत्रणाचा अवलंब करुन योग्य वेळी रासायनिक तण नियंत्रण तसेच आंतरमशागत करण्यात यावी.
  • रबी पिकांची शक्यतो लवकर पेरणी करावी. ओलाव्याच्या उपलब्धतेनुसार, योग्य मशागतीचा (शुन्य मशागत / कमीत कमी मशागत / सर्व साधारण मशागत) अवलंब करावा.

 

आपत्कालीन पीक नियोजन

मराठवाडा विभागात कृषि उत्पादन हे मुख्यत: कोरडवाहू शेतीवर आधारीत असून उत्पादन क्षमता पावसाच्या अनियमीतेवर अवलंबून असते. पावसाच्या आगमन, निर्गमनानुसार योग्य पीक पद्ध्तीचे नियोजन केल्यास उत्पादनामध्ये स्थिरता येऊ शकते. आपत्कालीन परिस्थिती खालील प्रकारच्या कारणांमुळे निर्माण होऊ शकते.

  • पर्जन्यमानाचे आगमन उशिरा होणे.
  • पर्जन्यमानाचे निर्गमन लवकर होणे.
  • पर्जन्यमानाचे आगमन / निर्गमन वेळेवर परंतू पीक कालावधीमध्ये पावसात दीर्घ अवधीचा खंड पडणे.
  • संततधार व अतिवृष्टी होणे.

 

अशा परिस्थितीत पिकांच्या नियोजनात बदल करणे निश्चित उत्पादनाच्या दृष्टीने हिताचे व उपयुक्त ठरते. पावसाच्या आगमन / निर्गमनाच्या परिस्थितीनुसार पिकांचे नियोजन खाली दिलेल्या तक्त्याप्रमाणे करण्यात यावे.

 

तक्ता : अनिश्चित पाऊसमानासाठी पर्यायी आपत्कालीन पीक नियोजन

वरील कालावधीत कमी – जास्त ४ ते ५ दिवसाचा फरक होऊ शकतो. आपत्कालीन पीक नियोजनात शक्यतोवर आतंरपीक पद्धतीचा अवलंब करावा. रब्बी हंगामात ऑक्टोबर महिन्यात सतत पाऊस असेल किंवा पेरणी योग्य परिस्थिती नसेल तर ३० ऑक्टोबर पर्यंत रब्बी पिके घेता येतात.

 

मृद व जलसंधारण –
कोरडवाहू शेतीमध्ये पावसाची पाणी मुलस्थानी मुरविण्याच्या उपयुक्त पद्धती, प्रामुख्याने वनस्पती व्यवस्थापन व जमिनी मशागत विषयक प्रकारात येतात. वनस्पती व्यवस्थापनाच्या पद्धतीमध्ये समतल मशागत व पेरणी, आंतरपीक पद्धती व जैविक बांधाचा तर जमीन मशागत पद्धतीमध्ये जलसंधारण सरी, उभ्या पिकात ठरावीक ओळीनंतर सरी, सरी – वरंबा, बंदिस्त सरी, रुंद वरंबा – सरी, बंदिस्त वाफ्यांचा समावेश होतो.

1)  समतल मशागत व पेरणी –
उंचसखल जमिनीवर पावसाचे अतिरिक्त पाणी सखल भागात जमा होते तर उंच भागात पाणी कमी भरल्यामुळे, ओलाव्याची करतरता भासते. अशा क्षेत्रावर समतल मशागतीच्या अवलंबनाने उताराला आडवे मातीचे असंख्य लहान वरंबे तयार होतात व तद्नंतरच्या आंतरमशागतीने मजबूत होतात. या वरंब्यामुळे पावसाचे पाणी सर्व क्षेत्रावर सारख्या प्रमाणात पसरते व जमिनीत जास्त प्रमाणात मुरते. उपलब्ध ओलाव्यामुळे रोपांची संख्या व वाढ योग्य राहून, उत्पादनात वृद्धी होते.

वहीतीकरीता लागणारी मशागत, पेरणी व आंतरमशागत क्षेत्राच्या उताराला आडवी अथवा समपातळी रेषेला संमातर करण्याच्या पद्धतीला समतल मशागत म्हणतात. क्षेत्राच्या समउंचीच्या बिंदुमधून काढलेली रेषा त्या क्षेत्राची समपातळी रेषा होय. बांध बंदिस्ती केलेल्या क्षेत्रावर, समपातळी अथवा ढाळीच्या बांधाचा, समतल मशागतीकरीता, मार्गदर्शक रेषा म्हणून उपयोग होतो. अशा क्षेत्रात बांधाला समांतर मशागतीची सर्व कामे करण्यात येतात. अनियमीत उताराच्या क्षेत्रावर समपातळी मार्गदर्शक रेषा आखून, रेषेला समांतर मशागत करणे आवश्यक आहे.

Gram and safflower intercropping methods
सूर्यफूल आणि हरभरा ची आंतरपिक पद्धतीने केलेली लागवड.

2) आंतरपिक पद्धती –
कोरडवाहू शेतीमध्ये, आंतरपिक पद्धतीचा अवलंब, शाश्‍वत उत्पादन व अधिक आर्थिक उत्पन्नाबरोबरच, मृद व जल संधारणाच्या दृष्टीनेही उपयुक्त आहे. वर उल्लेखीत मशागतीच्या पद्धतींच्या खालोखाल आंतरपिक पद्धती, मृद व जल संधारणाचे कार्य साध्य करतात. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने शिफारस केलेल्या कापूस व मुग / उडीद / सोयाबीन (१:१), ज्वारी व तूर (४:२), सोयाबीन व तूर (४:२), बाजरी व तूर (३:३) व रब्बी ज्वारी व करडई (६:३) आंतरपिक पद्धतीचा अवलंब करण्यात यावा.

 

3 ) जैविक बांध –
क्षेत्राच्या समपातळी रेषेवर, साधारणत: मातीच्या बांधाच्या अर्ध्या अंतरावर, वनस्पतीच्या निर्माण केलेल्या ओळीतील अडथळ्याला जैविक बांध म्हणतात. जैविक बांध निर्माण करण्यासाठी खस, गिरीपुष्प, सुबाभुळ, झुडुपवर्गीय उत्पादक वनस्पती किंवा चराऊ गवताचा उपयोग करण्यात यावा. साधारणत: २५ ते ३० मीटर अंतरावर, १५ ते २० से.मी. अंतरावरील दोन ओळीमध्ये, निवड केलेल्या वनस्पतींची पावसाळ्यात लावणी करण्यात यावी. वनस्पतीच्या प्रकारानुसार १ ते २ वर्षात बांध निर्माण होतो. वेळोवेळी छाटणी करुन बांधाची उंची व रुंदी ३० ते ४० से.मी. राखण्यात यावी. जैविक बांधाच्या छाटणीचे उपउत्पादने, पिकांमध्ये आच्छादनाकरीता, सेंद्रिय अन्नद्रव्ये स्त्रोत म्हणून अथवा जनावरांना चाऱ्यांकरीता उपयोगात येतात. जैविक बांधामध्ये खस गवताचा बांध, सर्व प्रकारच्या मृदा व हवामान विषयक क्षेत्रामध्ये अधिक कार्यक्षम आहे.

 

4) जलसंधारण चर
काळ्या खोल व भारी जमिनीच्या कोरड्या अवस्थेत भेगा पडण्याच्या गुणधर्मामुळे, बांधबंदिस्तीची नियमीत निगा राखणे खर्चीक व गैरसोईचे होते. अशा जमिनीवर जल संधारणाकरिता पर्यायी उपाय म्हणून बेल्लारी येथील विभागीय मृद व जलसंधारण संशोधन केंद्राने जलसंवर्धन चरांची पद्धत विकसित केली आहे. यामध्ये समपातळी अथवा ढाळीच्या बांधाच्याच काटछेदाचे चर घेण्यात येऊन चरामधील माती, काठावर टाकून बांध निर्माण करण्यात येतो. चरामध्ये साठवलेले पाणी, गरजेच्या काळात, संरक्षित सिंचनाकरीताही उपयोगात येते.

 

5 ) जलसंधारण सरी
जमिनीची मशागतीची कामे पूर्ण झाल्यानंतर, पेरणीपूर्वी उताराला आडवी काढण्यात आलेली खोल सरी, मूलस्थानी जलसंधारणाची एक साधी व उपयुक्त पद्धत आहे. ही सरी पीक काढणीपर्यंत नियमीत राखण्यात यावी. ओळीत पेरण्यात येणाऱ्या आंतरपीक पद्धती तसेच सलग पिकाकरीता ही पद्धत उपयुक्त आहे. बैलाच्या सरीच्या नांगराने अथवा कोळप्याच्या साह्याने उतारानुसार ५ ते १० मीटर अंतरावर, ४५ ते ६० से.मी. रुंद व ३० से.मी. खोल सरी काढण्यात यावी. जलसंधारण सरी समपातळीवर घेण्याचे ऐवजी, सरीच्या लांबीवर ०.२ ते ०.४ टक्के उतार ठेवल्यास ही सरी अतिरिक्त पाणी शेताबाहेर वाहून नेण्याचेही कार्य करते.

 

6 ) उभ्या पिकात ठरावीक ओळीनंतर सरी –
खरीप पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी आंतर मशागतीची सुरुवातीची कामे पूर्ण झाल्यानंतर, बळीराम अथवा लाकडी नांगराने पिकांच्या ओळीमध्ये प्रत्येक २, ४ किंवा ६ ओळीनंतर काढण्यात आलेली १५ ते २० से.मी. खोलीची, अरुंद सरी कोरडवाहू पिकांकरीता उपयुक्त आहे. उभ्या पिकांत काढण्यात आलेल्या अशा सऱ्यांचा फायदा, दिर्घ कालावधीच्या पिकांमध्ये (उत्पादन वाढीकरीता) विशेष होतो. कापूस, तूर सारख्या जास्त अंतरावरील पिकांमध्ये प्रत्येक दोन ओळीनंतर तुर, ज्वारी, बाजरी, मुग, उडीद, सोयाबीन सारख्या कमी आंतरावरील पिकांमध्ये प्रत्येक ४ ते ६ ओळीनंतर सऱ्या काढण्यात याव्यात.

 

7 ) सरी-वरंबा आणि बंदिस्त सरी
हलक्या तसेच मध्यम उताराच्या जमिनीवर, जास्त अंतरावरील पिकांकरीता ही पद्धत उपयुक्त आहे. बळीराम किंवा सरीच्या नांगराने अथवा कोळप्याच्या साह्याने, पेरणीपूर्वी ५० ते ६० से.मी. अंतरावर सरी – वरंबे तयार करुन वरंब्यावर पेरणी / लावणी करण्यात येते.

कोरडवाहू शेतीमध्ये आंतर मशागतीची सुरुवातीची कामे झाल्यानंतर, सरी वरंबे तयार करण्यात यावेत. उताराच्या जमिनीमध्ये सरीच्या लांबीवर ५ ते ७ मीटर अंतरावर सऱ्यांमध्ये आडवे वरंबे तयार करण्यात यावेत. यामुळे सरीमध्ये जमा झालेले पाणी उताराच्या दिशेने न वाहता जमिनीत जेथल्या तेथेच मुरते. कोरडवाहू भागातील चोपण व क्षारयुक्त जमिनीत, विद्राव्य क्षारांचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने बंदिस्त सरी पद्धत उपयुक्त आहे.

 

8 ) रुंद वरंबा – सरी पद्धत
हि पद्धत भारी जमिनीमध्ये जलसंधारण तसेच अतिरिक्त पाण्याच्या निचऱ्याच्यादृष्टीने उपयुक्त आहे. जास्त अंतरावरील पिकाच्या दोन ओळी तर कमी अंतरावरील पिकाच्या ३ ओळी वरंब्यावर येतील, यानुसार नियोजन करुन वरंब्याच्या दोन्ही बाजूला सऱ्या काढुन सऱ्यांना ०.१ ते ०.३ टक्के उतार देण्यात यावा. वरंब्यावर ओळीत लावणी अथवा पेरणी करण्यात यावी. कोरडवाहू पिकांकरीता आंतरमशागतीची सुरुवातीची कामे झाल्यानंतर सऱ्या काढणे सोईचे आहे.

 

9 ) बंदिस्त वाफे / बंदिस्त बांध (कंपार्टमेंटल बंडिंग)
अल्प उताराच्या तसेच छोट्या आकाराच्या कामात क्षेत्राच्या परीघावर बांध टाकून मूलस्थानी जलसंधारण करणे शक्य आहे. याकरीता १ मीटर उंचीपर्यंतचा बांध व आपत्‍कालीन परिस्थितीत अतिरिक्त पाण्याच्या निचऱ्याकरीता सांडव्याची व्यवस्था आवश्यक आहे.

कोरडवाहू शेतीमध्ये पेरणी व आंतरमशागतीच्या गरजेमुळे, मुलस्थानी जलसंधारण पद्धतीचा अवलंब कष्टाचे व गैरसोईचे होते. अशा परिस्थितीत सहज करता येऊ शकणाऱ्या तसेच कमी खर्चीक समतल मशागत, जलसंधारण सरी व उभ्या पिकांतील ठरावीक ओळीनंतर सरीसारख्या पद्धतींचा अवलंब स्वतंत्रपणे अथवा परिस्थितीनुसार एकत्रीतपणे करणे, शाश्‍वत उत्पादन तसेच भूजल पुनर्भरण वाढविण्याच्या दृष्टिने आवश्यक आहे.

Home | मृद व जलसंधारण विभाग, महाराष्ट्र शासन

जलसंधारण :
शेततळी व पाण्याचा पूनर्वापर – मृद व जलसंधारणांच्या उपायांचा अवलंब करुनही जमिनीत न मुरलेले पावसाचे अतिरिक्त पाणी जमिनीच्या पृष्ठभागावरुन वाहून जाते. हे पाणी शेताच्या खोलगट भागात शेततळ्याद्वारे साठवून संरक्षित सिंचनाकरिता उपयोगात आणता येते. शेततळ्यातून निचऱ्यामुळे होणारी पाण्याची हानी टाळण्याकरीता, शेततळ्याच्या उताराच्या आतील बाजूवर, प्लॅस्टिक आवरणाचा अथवा चोपण माती व गवताच्या मिश्रणांचा थर देण्यात यावा. शेततळ्यात जमा झालेले पाणी मर्यादित असल्यामुळे त्यांच्या कार्यक्षम वापराच्या दृष्टीने कोरडवाहू फळबागाकरिता ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब तर पिकांच्या संरक्षित सिंचनाकरीता दोन ते तीन सरी आड सरी भिजवून करण्यात यावा. संरक्षित सिंचनामुळे खरीप हंगामातील पिकांना पावसातील दिर्घकालीन खंडाच्या काळात तसेच रबी हंगामातील पिकांच्या संवेदनशिल अवस्थेतील पाण्याअभावी होणारे पिकांचे नुकसान टाळल्या जाऊन, निश्चित उत्पादन मिळते.

मराठवाडा विभागातील हमखास पावसाच्या प्रदेशात पाणलोट क्षेत्राच्या क्षेत्रफळानुसार शेततळ्याचे आकारमान तसेच संरक्षित सिंचनाचे क्षेत्र खालीलप्रमाणे असावे.

जमीन आणि पाण्याचे संवर्धन करणे हा कोरडवाहू शेतीचा आत्मा आहे.

वरील माहिती ही वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांचा कृषि तंत्र वरुण घेण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *