Coconut Farming – शेतकऱ्याचा धाडसी प्रयोग ! तीन एकरात नारळाच्या झाडांची लागवड …

Coconut Farming- : नारळाच्या लागवडीतून धुळ्यातील शेतकरी मजूर मुक्त शेती करत आहे. तीन एकरात त्याने नारळाची लागवड केली आहे. या लागवडीची चर्चा संपुर्ण परिसरात पसरली आहे.

उत्तर महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग

शेतकरी गणेश चौधरी यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी आपल्या अनोख्या प्रयोगातून वाफा खाचा यंत्राची निर्मिती केली होती. यानंतर गणेश चौधरी यांनी आता पारंपारिक शेतीला फाटा देत आपल्या तीन एकर शेतात नारळाच्या झाडांची लागवड केली आहे. या फळ पिकातून आपण उत्तर महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग केला असल्याचे त्यांनी सांगितले. गणेश चौधरी यांनी आपल्या तीन एकर शेतात कोलंबस आणि मलेशियन ग्रीन डार्क या नारळाच्या झाडांची लागवड केली आहे.  यातील कोलंबस या नारळाच्या झाडाचे आयुर्मान हे पन्नास वर्षे असून मलेशियन ग्रीन डार्क या नारळाचे आयुर्मान साठ वर्षे आहे.

प्रयोगशील उपक्रमातून शेतकऱ्यांचा फायदाच होणार 

गणेश चौधरी यांनी नारळाच्या झाडाच्या शेतीतून मजूरमुक्त शेतीचा प्रयोग केला आहे. यातून शेतीच्या उत्पन्नातून होणारी घट ही देखील कमी होणार आहे. पारंपारिक पिकांमध्ये भावात होणारी चढ-उतार तसेच या पिकांना लागणारी कीड यामुळे शेतकऱ्यांचे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असते. मात्र, या नारळाच्या झाडाच्या शेतीतून आपण उत्पन्नात होणारी घट वाचवणार असून या प्रयोगशील उपक्रमातून शेतकऱ्यांचा फायदाच होणार असल्याचे चौधरींनी सांगितले.

 नारळाच्या शेतीचा प्रयोग पाहण्यासाठी पंचक्रोशीतील शेतकरी देतायेत भेट

नारळाचे पाणी बाजारात विक्रीसाठी आणून आपण त्यातून वेगळा प्रयोग करणार असल्याचे चौधरी यांनी सांगितले. पारंपारिक पिकांना पर्याय म्हणून बहुवार्षिक पिकांची लागवड करणे ही काळाची गरज असल्याचे गणेश चौधरी यांनी सांगितले. त्यांनी केलेल्या नारळाच्या शेतीचा प्रयोग पाहण्यासाठी पंचक्रोशीतील शेतकरी या ठिकाणी भेट देत आहेत. ही शेती सध्या धुळे जिल्ह्यात चांगला चर्चेचा विषय ठरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *