Trap Crop- सापळा पीक लागवडीचे महत्व आणि फायदे .

Trap Crop- मुख्य पिकामध्ये येणाऱ्या किडींपासून नुकसान कमी करण्याच्या दृष्टीने किडींना संवेदनशील किंवा जास्त बळी पडणारे दुसरे पीक मुख्य पिकासोबत घेतले जाते, त्यामुळे त्या पिकाकडे कीड आकर्षित होते आणि पर्यायाने मुख्य पिकाचे संरक्षण होते, अशा पिकांना ’सापळा पिके’ म्हणतात. सापळा पिकांमुळे मुख्य पिक सुरक्षित राहुन हे गौण पिक किडींद्वारे खाउन टाकल्या जाते. बऱ्याचदा किडीस अधिक प्रमाणात बळी पडणारे एखादे पीक अल्पशा क्षेत्रावर मुख्य पिकापूर्वी घेतल्यास त्याकडे मोठ्या प्रमाणावर किडींना आकर्षून त्यांचे नियंत्रण करता येते.
सापळा पीक वापरण्याची तत्त्वे –
– सापळा पीक किडींना आकर्षित करणारे असावे.
– मुख्य पिकाच्या शेतातील कालावधीत सुरवातीपासून ते अखेरपर्यंत किडींना आकर्षित करणारे असावे.
– सापळा पिकावरील किडींची संख्या खूप वाढल्यास ते उपटून टाकावे किंवा कीटकनाशकाची फवारणी करावी.
– सापळा पिकावरील किडींचे अंडीपुंज व किडी गोळा करून नष्ट कराव्यात.
– काही सापळा पिकांच्या विक्रीतून अधिकचे उत्पन्न मिळू शकते. त्याचाही विचार व्हावा.
सापळा पिकाची लागवड करताना त्यांची वाढ कशी होते? त्यांना जागा किती लागते? त्यांचा जीवनक्रम, मुख्य पिकाबरोबर पाणी, अन्नद्रव्य, सूर्यप्रकाश याबाबतीत त्यांची होणारी स्पर्धा या गोष्टींचा अभ्यास करावा. सापळा पिकांची लागवड ही मुख्य पिकांच्या सभोवताली करतात, याला ‘पेरीमीटर ट्रॅप क्रॉपिंग (पी.टी.सी.)’ असे म्हणतात. एखाद्या किल्ल्याच्या सभोवताली जशी संरक्षक भिंत असते, तशीच ही पद्धत असते. सापळा पिकाच्या एक किंवा दोन ओळींनी ही भिंत तयार होते. आपल्या शेताचा आकार, मुख्य पिकाचे एकूण क्षेत्र इत्यादीवरून सापळा पिकाचे क्षेत्र अथवा त्याची प्रति चौरस मीटर संख्या (घनता) ठरविता येते.
तूर –
– तूर सलग पेरणीसाठी तुरीच्या बियाण्यात 1 टक्का ज्वारी अथवा बाजरीचे बी मिसळून पेरणी करावी. अर्थात तुरीचे बियाणे 10 किलो असल्यास त्यात 100 ग्रॅम ज्वारी किंवा बाजरीचे बी मिसळून पेरणी करावी, त्यामुळे मित्र पक्षी आकर्षित होऊन शेंगा पोखरणाऱ्या अळीचा फडशा पाडतील.
– घाटे अळी, सूत्रकृमी यांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी तुरीच्या चार ओळींनंतर ज्वारीच्या दोन ओळी असे आंतरपीक घ्यावे.
– झेंडूची सापळापीक म्हणून तुरीच्या शेताच्या चारही बाजूंनी लागवड करावी.
भुईमूग –
– भुईमूग या पिकाच्या बॉर्डर लाइनने सूर्यफुलाची सापळा पीक म्हणून लागवड केल्यास केसाळ अळी, स्पोडोप्टेरा व घाटे अळी या किडी सर्वप्रथम सूर्यफुलाची मोठी पाने व पिवळ्या रंगाच्या फुलांकडे आकर्षित होऊन अंडी घालतात. सूर्यफुलावरील अंडीपुंज प्रादुर्भावग्रस्त पाने अळ्यांसहित नष्ट करावीत.
उस –
– उसात द्विदल (चवळी) पीक आंतरपीक म्हणून घेतल्यास द्विदल पिकातील भक्षक उसावरील लोकरी मावा कमी करण्यास मदत करतात.
– उसात कांदा, लसूण, कोथिंबीर घेतल्यास खोड कीड कमी होते.
टोमॅटो –
टोमॅटोवरील फळ पोखरणारी अळी व सूत्रकृमींच्या नियंत्रणाकरिता टोमॅटो पिकाच्या बॉर्डरलाइनने मुख्य पिकाच्या अंतरानुसार झेंडूची-एक ओळ आणि मका-चार ओळी सापळा पीक म्हणून लागवड करावी.
सापळा पिके व ओळख
कोबीवर्गीय पिके –
कोबी, फ्लॉवर इत्यादी कोबीवर्गीय पिकांमध्ये दर 17 ओळींनंतर एक ओळ मोहरी घेऊन आपण या पिकातील चौकोनी ठिपक्‍याच्या पतंग (डायमंड बॅक मॉथ) या किडीची तीव्रता कमी करू शकतो. मोहरी मात्र मुख्य पिकापूर्वी तीन आठवडे आधी पेरावी, त्यावरील कीटक शिफारशीत कीटकनाशकाच्या फवारणीने नियंत्रित करावेत.
सापळा पिकाचे फायदे –
– मित्रकीटकांचे व पक्ष्यांचे संवर्धन होते.
– पीक संरक्षणाचा खर्च कमी होतो.
– पिकाचे उत्पादन आणि प्रत सुधारता येते.
– सापळा पिकापासून अधिकचे उत्पादन घेता येते.
– माती व पर्यावरणाचे संवर्धन होते.
वरील माहिती व चित्र हे डॉ. विनायक शिंदे-पाटील, अहमदनगर आणि डॉ. सारिका वांद्रे, कोल्हापूर यांचे मूळ लेखातून घेतले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *